‘खाकी’चं स्वप्न मैदानावरच तुटलं! पुण्याच्या मैदानातच 23 वर्षीय तरुणांन सोडला जीव, नेमकं काय घडलं?

पुणे : अंगावर खाकी वर्दी चढवून आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक तरुण आपलं सर्वस्व पणाला लावत असतात. हेच खाकीच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मैदानात उतरलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रसंग घडला.शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या कारागृह शिपाई भरती प्रक्रियेत पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३, रा. चिंचोली, जि. बुलढाणा) या तरुणाने अखेरचा श्वास घेतला.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कारागृह शिपाई भरतीची शारीरिक चाचणी सुरू होती.शनिवारी सकाळी 9 वाजून 24 मिनिटांनी पुरुषोत्तम 1600 मीटर धावण्याच्या शारीरिक चाचणीसाठी मैदानात उतरला होता. त्याने अत्यंत वेगाने दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, तिसऱ्या फेरीपर्यंत सुमारे 1400 मीटर अंतर पार केल्यानंतर मोठा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला.
त्याच क्षणी तातडीने मैदानावरील वैद्यकीय पथकाने धाव घेत त्याची प्राथमिक तपासणी केली असता, त्याच्या हृदयाचे ठोके अत्यंत मंद झाले होते. त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
चालू वर्षातील पोलीस भरतीदरम्यान झालेला हा तिसरा मृत्यू आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाने 5 किमीची अट कमी करून 1600 मीटर केली असून मैदानावर रुग्णवाहिका अनिवार्य केली आहे. मात्र, तरीही अशा घटना थांबत नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.