खरात प्रकरण भोवलं! रूपाली चाकणकरांना SIT कडून समन्स, चौकशी होणार?

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदा पाठोपाठ त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आले. त्यानंतर आता त्यांची एसआयटी कडून चौकशी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स बजावण्यात आले आहे.चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या विश्वस्त होत्या.या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटीकडून आता चौकशी होणार आहे. शिवानिका संस्थांचे सर्व व्यवहार आता SIT च्या रडारवर आहेत.
नाशिक महिला पोलिसांचे पथक रुपाली चाकणकरांना समन्स देण्यासाठी पुण्याला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटीकडून शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्याचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. या सर्वांच्या चौकशीतून नेमकी काय धक्कादायक माहिती समोर येतेय ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या खरात प्रकरणातून अनेक राजकीय नेत्यांची कनेक्शन उघड होत असल्याने त्यावर आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ‘समन्स पाठवणे मोठी गोष्ट नाही. समन्स सर्वांना पाठवला जातो. पण चौकशी केल्यानंतर काय कारवाई होते ते महत्वाचे राहिल. असे त्यांनी स्पष्ट केले.