अजिंठा लेणीत आग्या मोहोळ उठला अन् पर्यटक सैरभैर पळाले ; डंकाने 10 जण थेट….

पुणे : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र या लेणीत मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. अशातच आता लेणी क्रमांक 4 परिसरात अचानक मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. यात दहा पर्यटक जखमी झाले असून लेणी परिसरात भीतीचे वातावरण पसरले

समोर आलेल्या माहितीनुसार, अजिंठा परिसरात लेणी पाहण्यासाठी शुक्रवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे मोहोळ उठले आणि माशांनी पर्यटकांचा पाठलाग सुरू केला. मधमाश्यांच्या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मधमाशांच्या हल्ल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढला की मधमाश्या उठण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढतात. अशा वेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही काळ त्या भागात जाण्यास मनाई केली जाते. तसेच मधमाश्या शांत झाल्यानंतर पर्यटकांना पुन्हा लेणी पाहण्यासाठी सोडण्यात येते, असे पुरातत्त्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी मनोज पवार यांनी तत्काळ सुरक्षारक्षकांना सूचना दिल्या आहेत. तसेच पर्यटकांची आवक काही काळ थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.