हवेली तालुक्यातील वाडी-वस्त्यांवरील हातपंप दुरुस्त करण्याची मोहिम; सभापती युवराज काकडे यांचा दिलासादायक निर्णय…

उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील ज्या गावातील व वाड्या-वस्त्यांवरील हातपंप पाणी असूनही बंद अवस्थेत आहेत, अशा हातपंपांची यादी आपल्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे त्वरित द्यावी. सदर बंद असलेले हातपंप लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समिती हवेली सभापती युवराज हिरामण काकडे यांनी दिली.

सद्यस्थितीत हवेली तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप नादुरुस्त आहेत. सध्या वाढत्या उन्हामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. हातपंप असून अनेक हातपंपाचे पाणी आटले आहे. पण, काही हातपंपांना भरपूर पाणी असताना केवळ ते नादुरूस्त असल्याने गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सदर बाब लक्षात घेऊन हवेली पंचायत समितीच्या वतीने हातपंपाची दुरूस्ती सुरू करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षांत टप्याटप्याने प्रत्येक वाड्या वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविले आहेत. सुरुवातीच्या काळात ते व्यवस्थित चालले, मात्र कालांतराने देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक हातपंप बंद पडले आहेत. तर बरेच हातपंप अनेक वर्षांपासून नादुरुस्त स्थितीत उभे आहेत. अनेक वर्षे वापर होत नसल्याने हातपंप गंजून गेले आहेत.

हातपंप सुरू असल्यास अनेक गावांना पाणी टंचाईतून दिलासा मिळेल. यांसाठी बंद असलेले हातपंपांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येणार असून आपल्या गावातील व वाड्या वस्त्यांवरील बंद अवस्थेत असलेल्या हातपंपांची यादी आपल्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे त्वरित द्यावी. असे आवाहन पंचायत समिती हवेली सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केले आहे.