छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण! श्रीपाद छिंदमला महापालिकेच्या सभेतून बाहेर काढले, पद रद्द….

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत मोठा गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादग्रस्त ठरलेले नगरसेवक श्रीपाद छिंदमला यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढले.

सभागृहात छिंदम यांना बोलण्याचा आणि बसण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, त्यांना प्रवेश नाकारण्याचा ठराव करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. सर्व नगरसेवकांनी एकमुखाने याबाबत आक्रमक भूमिका घेत, गरज पडल्यास सभात्याग करण्याचाही इशारा दिला.
दरम्यान, अंदाजपत्रकीय चर्चेदरम्यान श्रीपाद छिंदम यांनी चर्चेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर, गणेश भोसले, मयूर बांगरे, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे आणि विकी जगताप यांनी त्यांना सभागृहात बसण्यास विरोध केला. भाजपाचे अमोल येवले यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनीही त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली.

संपत बारस्कर यांनी छिंदम यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर काही नगरसेवक आक्रमक होत त्यांच्या दिशेने धावले आणि सर्वांनी मिळून त्यांना सभागृहाबाहेर काढले. या घटनेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला सभागृहात प्रवेश देऊ नये, अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी मांडली. याबाबत कायदेशीर मार्गाने विषय अजेंड्यावर घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, यापूर्वीही संबंधित व्यक्तीचे पद रद्द करून त्याला सभागृहातून बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात यावा, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. नगरसेवक संपत बारस्कर आणि इतर सदस्यांनी इशारा देत म्हटले की, पुढील सभेत हा विषय अजेंड्यावर नसेल तर आम्ही सभागृहात थांबणार नाही.