मंत्री नरहरी झिरवळांची व्हायरल व्हिडिओ प्रकरणी विकेट पडणार? राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, म्हणाले….

पुणे : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. लिपिक प्रकरणानंतर आता त्यांच्या कथित व्हिडिओने समाज माध्यमांवर संतापाचे वातावरण आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.मंत्री नरहर झिरवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून एक मोठा खुलासा केला आहे. तर झिरवळांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्र्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते तृतीयपंथी पवन यादव याच्यासोबत दिसत आहेत. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी पवन हा मंत्री झिरवाळ यांच्याबरोबर बिछान्यावर असून त्याच्या शेजारी खाद्य आणि मद्य असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर स्वतः मंत्री झिरवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून तो व्हिडिओ चुकीचा असल्याचा सांगितल आहे.
नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नरहरी झिरवळ यांनी मला फोनवरून माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं आहे की, हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही तात्काळ तक्रार दाखल करा. या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल. त्याची सत्यता पाहण्यात येईल.

तसेच या प्रकरणाची सत्यता पुढे आल्यानंतरच झिरवळ यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी योग्य निर्णय घेऊ.असे स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे झिरवळांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स उरला नसल्याचे समोर येत आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.