नायगाव गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; नाशिकमधून फरार आरोपी जेरबंद, अल्पवयीनसह चौघांचा सहभाग उघड, उरुळी कांचन व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी..


उरुळी कांचन : नायगाव (ता. हवेली) येथील कबीर चायनीज हॉटेलमध्ये गावठी पिस्तूलाने गोळीबार करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन प्रमुख फरार आरोपींना उरुळी कांचन पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केले.

सिद्धार्थ गोविंद कांबळे (वय-२८, रा. कोरेगाव मूळ) आणि संग्राम हरिश्चंद्र हुलगे (वय- २० रा. उरुळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत आरोपींकडून दोन गावठी अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

सविस्तर माहिती अशी की, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, नायगाव येथील कबीर चायनीज हॉटेलमध्ये फिर्यादी मिलिंद बापू शेलार (वय ३८) उपस्थित असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी हल्ला केला.

त्यातील एकाने पाण्याची बाटली मागण्याचा बहाणा करून पिस्तूल काढत शेलार यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले. या प्रकरणी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी यापूर्वी नवनाथ आनंदा घुले (वय २८, रा. दहीटणे) याला अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.

तपासादरम्यान मुख्य सूत्रधार सिद्धार्थ गोविंद कांबळे आणि संग्राम हरिश्चंद्र हुलगे हे नाशिक परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही अटक करण्यात यश मिळवले.

पुढील चौकशीत फिर्यादी आणि सिद्धार्थ कांबळे यांच्यात जुना जमिनीचा वाद असल्याचे समोर आले. याच वादातून सिद्धार्थने इतर साथीदारांच्या मदतीने हा हल्ल्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!