आपल्या देशात पेट्रोल डिझेल आणि गॅसचा साठा किती? आता देशातील नागरिकांना सरकारने दिली खरी खरी माहिती, जाणून घ्या….

दिल्ली : सध्या देशात काहीसे अस्थिरतेचे वातावरण असल्याचे बघायला मिळत आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल आणि LPG च्या टंचाईबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं टंचाई भासणार का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

पेट्रोलियम मंत्रायलाने सांगितले की देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच देशातील सर्व पेट्रोल पंप आणि LPG वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही सरकारने दिली. यामुळे विनाकारण अफवा पसरवून दिशाभूल करू नका, असे म्हटले आहे.
काही ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा. देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही. सर्व रिटेल फ्युएल आउटलेट्सकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे.

वितरण सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळी मजबूत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सध्या नाही, नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी करू नये. पेट्रोल, डिझेल आणि LPG चा पुरवठा सुरळीत सुरू असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई किंवा घबराट करण्याचे कारण नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून राज्यांसाठी 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलच्या वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून राज्यातील शिधापत्रिका धारकांना 3 लिटर रॉकेल मिळणार आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असली, तरी भारताने परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.