इंधन तुटवडा नाहीच! मोदी सरकारची मोठी घोषणा; जाणून घ्या नवी योजना…

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला असून देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनटंचाई निर्माण होईल, या भीतीने नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. पेट्रोल पंपांवर दिसणाऱ्या रांगा या केवळ अफवांमुळे निर्माण झालेल्या घबराटीतून (पॅनिक बायिंग) लागल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताची वार्षिक इंधन शुद्धीकरण क्षमता सुमारे 260 दशलक्ष टन असून सध्या सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. तसेच, पुरवठा करणाऱ्या टर्मिनल्सवरही पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इंधनाच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून सध्या बाजारातील स्थिती पूर्णपणे स्थिर असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. इंधनावरील ताण कमी करण्यासाठी आणि पर्यायी ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. घरगुती वापरासाठी पीएनजी जोडण्यांचा विस्तार आणि वाहतुकीसाठी 100 टक्के सीएनजी पुरवठा सुनिश्चित करण्यावर सरकारचा विशेष भर आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय ठरू शकत नाही, अशी भारताची ठाम भूमिका मांडत पंतप्रधानांनी शांततेचे आवाहन केले.
तसेच, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या राजदूतांची भेट घेतली. या तणावपूर्ण परिस्थितीत इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल भारताने इराण सरकारचे आभार मानले आहेत.