मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; फेब्रुवारी हप्त्याबाबत नवी अपडेट..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता राज्य सरकारने फेब्रुवारी २०२६ चा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यासाठी २७७ कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.
दरम्यान, यामुळे येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषानुसार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
आता फक्त ६ दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.
ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांनी 31 मार्चपर्यंत ही प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा फेब्रुवारीचा हप्ता तसेच पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात. वेळेत ई-केवायसी पूर्ण केल्यास योजना लाभ नियमितपणे मिळत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.