लोणी काळभोर येथील विशेष ग्रामसभेत अत्याधुनिक कचरा वर्गीकरण प्रकल्पासह नदी सुधारप्रकल्प – गार्डन व ओपन जिम उभारण्याचा ठराव मंजुर


लोणी काळभोर : येथील ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११३ मधील १८ एकर जागेची शासकीय मोजणी करून तेथील नदीपात्रातील जागा वगळून उर्वरित जागेवर अत्याधुनिक कचरा वर्गीकरण प्रकल्पासह नदी सुधार प्रकल्प तसेच गार्डन व ओपन जिम उभारण्यात येणार असल्याचा ठराव लोणी काळभोर येथील विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

अनेक वर्षांपासून मुळा-मुठा नदीपात्रालगत लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जमा होत असलेला कचरा टाकण्यात येत होता. गेल्या १५ दिवसांपूर्वी त्याने पेट घेतल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांना झाला. त्यामुळे कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत या दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्तीत कचरा न उचलल्याने अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो आहे हे लक्षात घेऊन या समस्येवर मात करण्यासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायतीने वरील ठराव संमत केला आहे.

आज सरपंच तथा प्रशासक नागेश काळभोर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत वरील ठरावासह एमआयटी प्रशासनाने ओढ्यावर केलेले ९ मिटर अतिक्रमण व नदीकडे जाणा-या रस्त्यावर केलेले अतिक्रमण पीएमआरडीने तात्काळ काढून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करून द्यावा. तसेच शासनाने गट क्रमांक ३९ मध्ये लोणी काळभोर व अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर गावाला जोडणारा नकाशातील रस्ता मोकळा करून द्यावा. तसेच एमआयटी संस्थेने शासकीय परवानगी शिवाय मुळा-मुठा नदीत बांधलेला विश्वराज बंधारा काढून टाकावा हे ठराव सर्वानुमते संमत केले. तसेच पाटबंधारे खात्याच्या वतीने ग्रामपंचायतीला चुकीची नोटीस बजावली याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.

ग्रामसभेत जिल्हा परिषद सदस्य शीतल कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी, माजी चेअरमन विठ्ठल काळभोर, शिवसेनेचे रमेश भोसले, संतोष भोसले, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर, यांचेसह सुर्यकांत काळभोर, सिध्देश्वर काळभोर, आदींनी वरिल ठराव मांडले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासंदर्भात अधिक माहिती देताना प्रशासक नागेश काळभोर म्हणाले की, वरील सर्व ठराव तात्काळ शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच यांवर त्वरित कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. येथील ग्रामदैवत श्री अंबरनाथ देवाचा वार्षिक उत्सव २ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. त्यामुळे कच-याचा त्रास होऊ नये म्हणून एका एजन्सीशी बोलणी करण्यात आली असून सदर एजन्सी साठलेला कचरा उचलून नेऊन त्याची विल्हेवाट लावणार आहे. तसेच यांवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी म्हणून आमदार माऊली कटके यांचेकडे लोणी काळभोरसह कदमवाकस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व नायगाव या गावांसाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देऊन तेथे कचरा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!