नैसर्गिक उपचार पध्दती हीच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधण्याची जीवनपद्धती ;उरुळीकांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचे कार्य जागतिक स्तरावर ; उपराष्ट्रपती सी.व्ही.राधाकृष्णन यांचे प्रतिपादन …


उरुळी कांचन: महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने केवळ व्यक्तींना शारीरिक-मानसिक आरोग्यच प्रदान केले नाही, तर ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण लोकांशी संस्थेने जोडून घेतलेले नाते आणि त्यांना शाश्वतता व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी देण्यात येत असलेले प्रशिक्षण अत्यंत प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील निसर्गोपचार आश्रमाच्या ८१ व्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके, आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे, वैद्यकीय संचालक आणि विश्वस्त सचिव डॉ. अभिषेक देवीकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे मुख्य विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, उरुळी कांचन या गावात महात्मा गांधीजींनी मणिभाई देसाई, बाळकोबा भावे, श्रीमती गंगाबेन भाटे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने १९४६ या वर्षी या आश्रमाची स्थापना केली. ही संस्था आता जागतिक स्तरावर सन्मानित होणाऱ्या एका केंद्रात रूपांतरित झाली आहे. या आश्रमाद्वारे मानवतेसाठी दिल्या जाणाऱ्या महान सेवेमुळे आज हे छोटेसे गाव संपूर्ण जगात ओळखले जाते.

‘निसर्गोपचार आश्रम’ ही एक चळवळ आहे, एक तत्त्वज्ञान आहे आणि गांधीजींच्या कालातीत दृष्टिकोनातून प्रेरित झालेली एक जीवनपद्धती आहे. निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ उपचारक आहे, असा गांधीजींचा दृढ विश्वास होता. नियमित शारीरिक व्यायाम, मानसिक शांतता आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा हा आश्रम आपल्याला देतो, असेही ते म्हणाले.

खरे आरोग्य हे गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांमध्ये नसून साधेपणा, शिस्त आणि निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्यामध्ये सामावलेले असते अशी गांधीजींची शिकवण होती. त्यानुसार हा आश्रम निसर्गोपचार, योगसाधना तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती असलेल्या आपल्या दृढ कटिबद्धतेच्या माध्यमातून हजारो लोकांची सेवा करत आहे. आज संपूर्ण जग जीवनशैलीशी संबंधित आजारांचा सामना करत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणावाशी संबंधित विकार यांचे प्रमाण आज अत्यंत चिंताजनक वेगाने वाढत आहे. आजकाल प्रत्येकजण तणावाचा सामना करत मर्यादित गरजा आणि निसर्गाशी मेळ साधणाऱ्या जीवनशैलीद्वारे त्यावर मात करता येते, असे राधाकृष्णन म्हणाले.

आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, याची हा आश्रम आपल्याला आठवण करून देतो. आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याची अवस्था होय. साधेपणा, कष्ट आणि प्रामाणिक मार्गाने आपण काम केले, तर आनंद आपोआपच आपल्या मनात प्रवेश करेल आणि आरोग्य चांगले राहील.

आज संपूर्ण जग, आरोग्य आणि स्वास्थ्यासह आधुनिक काळातील विविध आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आपल्याकडे आशेने पाहत आहे. जागतिक दृष्टिकोन आता बदलला आहे. केवळ पाश्चात्य वैद्यकशास्त्रच सर्वश्रेष्ठ मानले जात होते, तो काळ आता आपण मागे टाकला आहे. आपल्या पारंपरिक उपचारपद्धती आजारांच्या मुळावर उपचार करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, भारताने आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धती, योग आणि तत्सम सर्वच क्षेत्रांचे पुनरुज्जीवन होत असून त्यांना जागतिक स्तरावरील मान्यता मिळत आहे.

भारत आता ‘जागतिक वेलनेस पर्यटनाचे’ एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. या आश्रमासह देशातील निसर्गोपचार केंद्रांमध्ये आजकाल मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक उपचारांसाठी आवर्जून येत आहेत. आयुर्वेदिक उपचार, सिद्ध, युनानी उपचारपद्धतींना महत्व आले आहे. आज संपूर्ण जग ‘योग दिन’ साजरा करत आहे. आपण जेव्हा ‘विकसित भारत’ या संकल्पनेकडे पाहतो, तेंव्हा त्यासोबतच ‘स्वस्थ भारत’ असणेही आपल्यासाठी तितकेच आवश्यक ठरते. या प्रवासात आपल्या आश्रमासारख्या संस्थांची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. निसर्गोपचार आश्रमाचे प्रयत्न आणि राज्य व केंद्र सरकारचे प्रयत्न यांच्या समन्वयातून होणारे कार्य हे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने अत्यंत मोलाचे ठरेल असे राधाकृष्णन म्हणाले.

जेव्हा व्यक्ती निरोगी असतात, तेव्हा कुटुंबे बळकट होतात आणि समाजाची भरभराट होते. तसेच राष्ट्राचा उत्कर्षही होतो. अशा वेळी, ‘विकसित भारत २०२७’ हे उद्दिष्ट त्याही आधी गाठणे शक्य होते. म्हणूनच, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपल्या सर्वांकडे संयम असणे आवश्यक आहे. आपण आपले मन नेहमीच एका ‘प्रवाही’ अवस्थेत ठेवले पाहिजे, जेणेकरून ते अधिकाधिक गोष्टी ग्रहण करू शकेल. ‘निसर्गोपचार आश्रमा’ ही संस्था पुढील पिढ्यांनाही असेच मार्गदर्शन, उपचार आणि प्रेरणा देत राहो, तसेच संपूर्ण मानवतेला संयमाचा धडा शिकवत राहील असा विश्वासही राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे महान पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्याच्या वर्षी ३३ कोटी लोकसंख्येवरून आपण १४० कोटी लोकसंख्या गाठली असून आयुर्मयादा दुप्पट झाली आहे. आपण अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र, अन्नाची गुणवत्ता, विषयुक्त अन्नामुळे जीवनशैलीशी संबंधित आजारांसह अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. निसर्गोपचार, आयुर्वेद, योगा, युनानी, आधुनिक उपचारपद्धतीं आपला समृद्ध वारसा आहे. स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार महत्वाचे आहेत. समग्र उपचार पद्धती आज महत्वाची असून निसर्ग हा आजारांवरील महान उपचारक आहे.

निसर्गोपचार आश्रम गेली ८ दशके समाजाची सेवा करीत आहे. पर्यावरण प्रदूषण, व्यसनधीनता आणि अयोग्य आहारामुळे विविध आजार वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशभरात निसर्गोपचाराचा प्रसार केल्यास रोजगार निर्मिती होण्यासोबत नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करता येईल. विकसित भारताचे स्वप्न स्वस्थ भारताच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकेल.निसर्गोपचार आश्रमाने विद्यापीठांसोबत समन्वय साधून भारतीय पारंपरिक उपचार पद्धतीचा प्रसार करावा. त्याद्वारे अशा उपचारासाठी कुशल मनुष्यबळ प्राप्त होईल.

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह म्हणाले, देशाला आत्मनिर्भर बनविण्यात स्वदेशी उपचारपद्धती महत्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०१४ नंतर केंद्र सरकारने देखील महात्मा गांधीजींच्या या आश्रमासारख्या प्रयोगांचा विस्तार करण्याच्या कामाला वेग दिला आहे. केंद्राने आयुष मंत्रालयाची स्थापना केली असून प्रत्येक वर्षी मंत्रालयाची आर्थिक तरतूद ४ हजार ४०० कोटीहून अधिक आहे.

जगात रोगोपचार खर्चिक होत असतांना सेवाभाव ही या आश्रमाची विशेषतः आहे. इथली कार्यपद्धती लक्षात घेतल्यास त्यात महात्मा गांधीजींच्या विचारांचा सुगंध दरवळतो आहे असे म्हणता येईल. माती, पाणी, ऊन, हवा या माध्यमांतून या ठिकाणी उपचार होत आहेत. इथली शिस्त इतरांनाही मार्गदर्शक आहे. साधे जीवन, स्वयंशिस्त आणि निसर्गाचा सन्मान करीत गांधीजींना अभिप्रेत असलेली आनंदी जीवनशैली स्वीकारता येईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, निसर्गोपचार आश्रम केवळ एक आरोग्य केंद्र नसून जीवन जगण्याचा महत्वपूर्ण मार्ग आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून स्थापन झालेला हा आश्रम नैसर्गिक उपचारपद्धतीच्या माध्यमातून आरोग्य, स्वावलंबन आणि साधेपणाच्या जीवनाचा संदेश देतो. केवळ आजारांवरील उपचार नव्हे तर सुदृढ जीवनशैली आणि निसर्गासोबत संतुलन राखण्याची प्रेरणा देखील देत आहे. निसर्ग आणि महात्मा गांधी यांचे अतूट नाते होते. ग्रामीण भागाचा विकास हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. भारताचा खरा आत्मा गावात वसतो, या विचारावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ग्रामीण उन्नती, स्वावलंबन आणि साधेपणाचा मार्ग स्वीकारला आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला.

निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येक आजार बरा करण्याची ताकद असते, हा गांधीजींचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी उरळी कांचन निसर्गोपचार आश्रम येथे पाहायला मिळते. गांधीजींचे हे विचार केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते साधेपणा, स्वावलंबन आणि ग्रामीण विकासाचा व्यापक संदेश देणारे आहेत. ‘खेड्याकडे चला’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच कालसुसंगत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!