‘कॅप्टन’ खरात प्रकरणाचं पुणे कनेक्शन, राजेंद्र जासुदकडून खरातला ब्लॅकमेलिंग ; प्रकरणाला वेगळे वळण..

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता या प्रकरणातील पुणे कनेक्शन समोर आले आहे. खरातला ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी पुण्यातील संशयित राजेंद्र अशोक जासूद याची आता विशेष तपास पथकामार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. यातून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भोंदू बाबा अशोक खरात यांच्या चौकशीत त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पुण्यातील राजेंद्र जासूद खरातचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असे सांगून समाजात बदनामी करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता. हे प्रकरण ‘सेटल’ करण्यासाठी संशयितांनी खरातकडे ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. शनिवारी खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव यांची सात तास ‘इन कॅमेरा’ चौकशी करण्यात आली. या चौकशीतून खरात प्रकरणाचे पुणे कनेक्शन उघड झालं.
आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील ‘एसआयटी’ने आता या खंडणी प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. पुण्यातील राजेंद्र जासूद याच्याकडे खरोखरच ते फोटो होते का? आणि असल्यास ते त्याच्याकडे कोठून आले? याचा शोध पोलीस घेत आहेत.

पुण्याचा राजेंद्र जासूद हा खरातच्या संपर्कात कसा आला आणि या मोठ्या खंडणी नाट्यात त्याचे नेमके काय हितसंबंध होते, याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खरातला ब्लॅकमेल करणारा जासूद आणि परब यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.