पुणेकरांनो लक्ष द्या! आता फिरायलाच नाही तर जेवायलाही चला मेट्रोमध्ये; ‘मेट्रो कोच रेस्टॉरंट’ सज्ज, जाणून घ्या कुठं आणि कसं..


पुणे : पुणेकरांच्या प्रवासाला आता खमंग चवीची अनोखी फोडणी मिळणार आहे. पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी एक खास आकर्षण उपलब्ध करून दिले असून, आता चक्क मेट्रोच्या डब्यात बसून वातानुकूलित वातावरणात जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

महामेट्रोने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक परिसरात ‘मेट्रो कोच रेस्टॉरंट’ उभारले असून, या प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले आहे. महामेट्रोने तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी हा अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. टिटागड कंपनीने पुरवलेल्या जुन्या मॉडेल मेट्रो कोचचे रूपांतर एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले आहे.

हे अनोखे रेस्टॉरंट पुणे येथील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाजवळ, कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात उभारण्यात आले असून, लवकरच ते पुणेकरांसाठी खुले करण्यात येणार आहे.

वनाझ-रामवाडी मेट्रो मार्ग आणि पिंपरी चिंचवड-स्वारगेट मेट्रो मार्ग या मार्गांवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांसह पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे रेस्टॉरंट एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

या उपक्रमातून महामेट्रोला दरमहा सुमारे १ लाख ४५ हजार रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू होईल, जिथे प्रवाशांना वाजवी दरात दर्जेदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!