संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.., ऐन उन्हाळ्यात अंड्याच्या दरात सर्वात मोठी कपात; पाहा आजचे दर

पुणे : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा फटका आता भारताच्या कुक्कुटपालन उद्योगाला बसू लागला आहे. आखाती देशांकडे होणाऱ्या निर्यातीमध्ये अडथळे निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा वाढला असून, त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.

परिणामी अंड्यांचे दर घसरले असून उत्पादक आणि व्यापाऱ्यांसमोर नवे आव्हान उभं राहिलं आहे. सध्या अंड्यांची घाऊक किंमत प्रति अंडे ७ रु वरून ४ रु पर्यंत घसरले आहेत. म्हणजेच १०० अंडी फक्त ४०० रुपयांमध्ये उपलब्ध होत आहेत.
किरकोळ बाजारातही पूर्वी ८ रु ते ९ रु दराने विकली जाणारी अंडी आता ५.५० रु ते ४ रु दराने मिळत आहेत. अंड्यांचे दर घसरल्यामुळे कुक्कुटपालकांचे उत्पन्न कमी झाले असून उत्पादन खर्च भागवणेही कठीण झाला आहे.

युद्धस्थितीपूर्वी भारतातून दररोज सुमारे १ कोटी अंड्यांची निर्यात आखाती देशांकडे होत होती. भारतातील निर्यातक्षम अंड्यांपैकी सुमारे ८० टक्के अंडी या देशांकडे पाठवली जात होती. निर्यात अचानक कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात अंडी देशांतर्गत बाजारात येऊ लागली.
त्यामुळे बाजारात पुरवठा वाढून अंड्यांचे दर खाली आले आहेत. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि बहरीन यांसारख्या देशांकडे होणाऱ्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.
अंडी हे प्रथिनांचे उत्तम स्रोत मानले जातात. त्यामध्ये Vitamin A, Vitamin D, Vitamin E, Vitamin B12, तसेच Iron आणि Selenium यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. साधारण १०० ग्रॅम अंड्यांमध्ये सुमारे १२.६ ग्रॅम प्रथिने आणि जवळपास १५५ कॅलरीज असतात. त्यामुळे संतुलित आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.