लोणी काळभोरची प्रिशा बोनुटे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये जगात पहिली…

लोणी काळभोर : येथील द टायग्रिष स्कूलच्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी प्रिशा बोनुटे हिने आंतरराष्ट्रीय संगणक विज्ञान ऑलिंपियाड या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत नेत्रदीपक यश संपादीत केले आहे. कमी वयात मिळवलेले हे यश शाळेसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.

प्रिशाने या स्पर्धेत 100 टक्के गुण मिळवत तब्बल 99.63 टक्के परसेंटाईल मिळवला. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने शाळा स्तर, झोनल स्तर, प्रादेशिक स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तर अशा सर्व टप्प्यांमध्ये अव्वल स्थान पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संगणक विज्ञान विषयातील तिची अचूक समज, वेगवान विचारशक्ती आणि तर्कशुद्ध उत्तरांमुळे तिने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
या यशाबद्दल प्रिशाला इंटरनॅशनल गोल्ड मेडल, गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन, सर्टिफिकेट ऑफ आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन तसेच 1हजार किमतीच्या भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आहे. एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकवणाऱ्या प्रिशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रिशाच्या या यशाबद्दल द टायग्रिष स्कूलचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि तिच्या पालकांनी आनंद व्यक्त करत तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम, ऑलिम्पियाड प्रशिक्षण आणि आधुनिक शिक्षणपद्धतीचा वापर केला जातो. याच सकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
प्रिशाच्या या उज्ज्वल यशामुळे लोणी काळभोर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शैक्षणिक क्षेत्रात द टायग्रिष स्कूलचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उज्ज्वल झाले आहे. परिसरातील नागरिक, पालकवर्ग आणि शिक्षणप्रेमींनी प्रिशाचे अभिनंदन करत तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अत्यंत लहान वयात मिळवलेले हे आंतरराष्ट्रीय यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असून “मेहनत, जिज्ञासा आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतीही उंची गाठता येते,” हे प्रिशाने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.