पोट भरायला नांदेडहून पुण्यात आले, पण शुक्रवारची संध्याकाळ कोमल अन् सचिनसाठी शेवटची ठरली, घडलं धक्कादायक…


पुणे : कंपनीच्या सीमाभिंतीचं काम सुरू असताना झालेल्या भीषण दुर्घटनेत तरुण मजूर दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. भिंत अंगावर कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना तळवडेच्या ज्योतिबानगर परिसरात घडली आहे.

सचिन शंकर राठोड (वय ३०) आणि कोमल सचिन राठोड (वय २५) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही मूळचे नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रहिवासी असून सध्या चाकणजवळील मेदनकरवाडी येथे वास्तव्यास होते. पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं गाव सोडून पुण्यात आलेल्या या जोडप्यासाठी शुक्रवारची संध्याकाळ शेवटची ठरली

मिळालेल्या माहितीनुसार, तळवडेमधील ज्योतिबानगर येथील इंडक्शन थर्मल कंपनीच्या खुल्या जागेवर विटांची सीमाभिंत बांधण्याचे काम सुरू होते. जागामालक सदाशिव आगळे यांनी हे काम कंत्राटदार दीपक जाधव यांना दिले होते.

शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हे दाम्पत्य भिंतीचे काम करत असताना, अचानक हीच भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. भिंत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

कंत्राटदार दीपक जाधव आणि जागामालक यांच्याकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का? कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव होता का? या बाबींचा पोलीस आता तपास करतील. एकाच वेळी तरुण पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!