एसटी महामंडळात होणार सर्वात मोठी मेगाभरती, कोणाला मिळणार पहिलं प्राधान्य?, जाणून घ्या संपूर्ण माहिती…


मुंबई : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या ‘लाल परी’ला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती होणार आहे. एसटी महामंडळात तब्बल १७ हजार ७४२ कर्मचाऱ्यांची महाभरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. परिवहन विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे पाठवला असून त्यावर अंतिम मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा सुरू आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, वित्त विभागाकडून तांत्रिक मंजुरी मिळताच या पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया वेगाने राबवली जाईल.

या चर्चेदरम्यान आमदार श्रीकांत भारतीय यांनी एसटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सरनाईक यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. २०२२ मध्ये झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान सेवा सुरू ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती.

आगामी भरती प्रक्रियेत अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांचा अनुभव महामंडळाच्या कामकाजासाठी उपयोगी ठरेल. एसटीच्या ताफ्यात गेल्या काही काळात मोठी वाढ झाली आहे आणि यामुळे मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे.

संपाच्या काळात महामंडळाकडे सुमारे १२,५०० बसेस होत्या. आता ही संख्या वाढून जवळपास १४,००० पर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर महायुती सरकारने दरवर्षी ५,००० नवीन बसेस खरेदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर ८,००० बसेस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी सुमारे ३,००० बसेसचे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!