पाऊस पुन्हा कोसळणार! ‘या’ ९ जिल्ह्यांना मोठा इशारा, थेट विजांच्या कडकडाटासह…

पुणे : राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात कधी पाऊस, उन्ह तर थंडी अशी स्थिती होती. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच हवामानात मोठे बदल होताना दिसले. तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 च्या पार आहे.

कधी प्रचंड उकाडा तर कधी अचानक पावसाच्या सरी अशा वेगवेगळ्या परिस्थितीचा अनुभव नागरिक घेत आहेत. आता पुन्हा एकदा पावसाचे सावट वाढण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानेराज्यासाठी महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. स ध्या तापमानात लक्षणीय वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्णतेचा जोर वाढलेला असतानाच राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. काही भागात पुढील काही तासांतच मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

शनिवारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे.
रविवारच्या दिवशी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात काही ठिकाणी जोरदार वारेही वाहू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी दुसरीकडे उष्णतेची तीव्रता देखील वाढत असल्याचे चित्र आहे. पुणे, नांदेड, बीड आणि परभणी या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईसह कोकण पट्ट्यात दमट आणि उष्ण हवामान वाढण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे.
देशातील तापमानाबाबतही वेगवेगळे विक्रम नोंदवले गेले आहेत. राजस्थानमधील फतेहपूर येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून तेथे 1.4 अंश सेल्सिअस इतके तापमान मोजले गेले. दुसरीकडे गुजरातमधील राजकोट येथे देशातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले असून ते 41.6 अंश सेल्सिअस इतके आहे. मंगळवारी अमरावती, वाशिम, ब्रह्मपुरी, सोलापूर , जळगाव आणि यवतमाळ या भागांत 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.