मुंबई महापालिकेत ‘रेलिंग’ घोटाळा? तातडीने 385 कोटींची निविदा गुंडाळली, प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह….

मुंबई: बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेत निविदा आणि घोटाळ्यांचे सत्र वारंवार समोर येत आहे.त्यानंतर आता मुंबईतील फूटपाथवर रेलिंग बसवण्यासाठी काढलेली 385 कोटी रुपयांची निविदा भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अवघ्या काही तासांतच रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई महापालिकेकडून याआधी देखील अनेक महत्त्वाच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये नुकतीच रद्द केलेली 385 कोटींची रेलिंग निविदा, कोकण रेल्वेची रेंट -ए -बाईक योजना, स्मार्ट सिटीच्या निविदा यासारख्या विविध भ्रष्टाचारांचे आरोप असलेल्या विविध निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान महापालिकेच्या 385 कोटीच्या रेलिंग निविदेत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त केल्यानंतर आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने ही निविदा गुंडाळली आहे.
महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने मुंबईतील फूटपाथवर रेलिंग बसवण्यासाठी 385 कोटींची निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, आमदार अमित साटम यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. गेल्या दोन वर्षांत पालिकेने रेलिंग आणि ‘स्ट्रीट फर्निचर’वर आधीच 300 कोटी रुपये खर्च केले असताना, पुन्हा त्याच कामासाठी 385 कोटींची उधळपट्टी कशासाठी? असा सवाल साटम यांनी उपस्थित केला. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली.

तसेच 385 कोटी ची रेलिंग निविदाही एका मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीच्या फायद्यासाठीच करण्यात आली होती असा आरोप देखील त्यांनी केला आहे.मनोरंजन क्षेत्रातील काही व्यक्तींनी आता पालिकेत ‘लायझनिंग’चा नवा व्यवसाय सुरू केला असून, त्यांच्या फायद्यासाठीच ही निविदा आहे.तसेच, पालिकेला स्वतःच्या ‘ई-वॉर्ड’चे ऑफिस बांधण्यासाठी पैसे नाहीत, पण 385 कोटींचे रेलिंग लावायला पैसे कुठून येतात? असा बोचरा सवालही त्यांनी केला. त्यानंतर ही निविदाही वादात सापडली आहे.