अधिवेशनाचा उत्तरार्ध वादळी ठरणार!ओम बिर्लांविरोधात आज अविश्वास प्रस्ताव, अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी किती मतांची गरज?

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून लोकसभेच्या कामकाजात आज नऊ मार्च हा ऐतिहासिक आणि वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला असून त्यावर आज चर्चा होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध आज वादळी होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, पश्चिम आशियातील युद्ध, इराणबद्दल सकारची भूमिका, रशियाकडून तेल खरेदी, पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन या मुद्द्यांवरून संसदेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, सदनात उपस्थित राहण्यासाठी भाजप, काँग्रेस यांनी आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे.
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करायचा असेल तर कमीत कमी 50 सदस्यांचा पाठिंबा लागतो. अविश्वास प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यावर चर्चा करून मतदान केले जात. पण 50 सदस्यांनी पाठिंबा दिला नाही तर प्रस्ताव अमान्य केला जातो. त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे.

लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.मोहम्मद जावेद, के. सुरेश आणि मल्लू रवी या काँग्रेस सदस्यांकडून लोकसभेत सूचना मांडली जाणार आहे. अध्यक्षांचे सभागृहातील वर्तन, विरोधकांना बोलू न देणे, महिला खासदारांवर आरोप. या कारणांमुळे विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडला जात आहे.
या प्रकरणादरम्यान ओम बिर्ला यांना सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी संविधानाने दिली आहे. ते स्वतःचा बचाव करू शकतात आणि प्रस्तावावर मतदान करू शकतात. पण प्रकरणावर चर्चा सुरू असताना ते कामकाजाचे अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत. आता आज अधिवेशनात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.