पुण्यात वसंत मोरेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; ‘ ते’ वक्तव्य करणं पडलं महागात?

पुणे: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना एक वक्तव्य भोवले असून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे महानगरपालिकेच्या एका कक्षामध्ये केलेल्या एका कृत्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना मोरे यांनी फिर्यादी लहाडे यांच्याबद्दल हेतू पुरस्कार अत्यंत खालच्या दर्जाची आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. केवळ पत्रकार परिषदेतच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.विश्वनाथ तुकाराम लहाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये विश्वनाथ तुकाराम लहाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वांसमोर शिवीगाळ करत जातीवाचक उल्लेख करून मानसिक छळ केला. या प्रकारामुळे समाजात आपली प्रतिमा मलीन झाल्याचे लहाडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

वसंत मोरे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. मात्र, आता थेट ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.