नागपूर स्फ़ोटाप्रकरणी मोठी कारवाई; कंपनीच्या संचालकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक, ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी…

नागपूर:नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आह. या घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कंपनीचे दोन मुख्य संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने नऊ आरोपींना सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील या फॅक्टरीमध्ये बारूद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटके बनवली जातात. या ठिकाणी झालेल्या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून या प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चालली आहे.कंपनीचे संचालक रवी प्रकाश चंद्र कामरा आणि राकेश सुदर्शन तिवारी यांनाही ताब्यात घेतले आहे. या दोन बड्या नावांच्या अटकेमुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान या कंपनीच्या सुरक्षेतील त्रुटी आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यांमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.आतापर्यंत एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, 10आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. 6 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपींची सखोल चौकशी केली जाणार आहे. या स्फोटाचे नेमके तांत्रिक कारण आणि सुरक्षेतील त्रुटींची कागदपत्रे तपासली जाणार आहेत.

या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 23 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आता याबाबत आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.