अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही? मोठी माहिती आली समोर…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमाने निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला.

धक्कादायक बाब म्हणजे बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. विमान अपघात होऊन महिना होत आला आहे. या प्रकरणी सीआयडी आणि डीजीसीएकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, इतक्या दिवसानंतरही या अपघाताचा साधा प्राथमिक अहवाल आलेला नाही. अजितदादांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे.
अजितदादांचा अपघात झाला नसून घातपात झाला आहे, असं रोहित पवार सातत्याने सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी अत्यंत बारकाईने मुद्दे मांडले आहेत. रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले. विमान अपघात हा गुन्हा 100 टक्के दखल पात्र आहे. मग यात गुन्हा का दाखल केला जात नाही, असा सवाल यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केला.

तसेच या विमान अपघाताची चौकशी सीआयडी, सीबीआयकडून करा आमचं काही म्हणंण नाही, परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी कली. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सीआयडीने आदेश दिला तरच बारामती पोलीस या प्रकरणात एफआयआर दाखल करून पुढील चौकशी करतील अशी माहिती युग्रेंद्र पवार यांनी दिली आहे. सीआयडीची पत्रकार परिषद होणार आहे, ती झाल्यानंतर ते मला कळवतील, सीआयडी यामध्ये चौकशी करत आहे, त्यामुळे एफआयआर दाखल करता येत नाही असं त्यांनी मला सांगितलं आहे. सीआयडीने आदेश दिला तरच बारामती पोलिस एफआयआर दाखल करून चौकशीला सुरुवात करतील. सीआयडीने आदेश दिल्यावर आम्ही इथे येऊन एफआयआर दाखल करू, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.