पुणेकरांनो, घराचे दरवाजे नीट तपासा, बिबवेवाडीत घडलं भयंकर, घटनेने उडाली खळबळ…


पुणे : पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबवेवाडी परिसरातील एका गजबजलेल्या सोसायटीत अज्ञात चोरट्यांनी थेट घराच्या बेडरूममध्ये प्रवेश करत मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

तसेच या घटनेत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी काही वैयक्तिक कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते.

घर बंद असल्याची खात्री झाल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. त्यांनी घराचं मुख्य कुलूप तोडत आत प्रवेश केला आणि थेट बेडरूमकडे मोर्चा वळवला. घरातील बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी त्यात ठेवलेले मौल्यवान सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल हस्तगत केला.

प्राथमिक माहितीनुसार, या घरफोडीत एकूण 16 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. भरवस्तीत, दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वर्दळीच्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने सोसायटीतील रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही आपापल्या घरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून, चोरट्यांनी रेकी करूनच हा डाव साधल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोसायटीतील इतर रहिवाशांनीही संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!