मुंबईतील कोस्टलरोड प्रकल्पालगतची 173 एकर जमीन अंबानी समूहाकडे ; ‘या ‘प्रकल्पातून काय साकारलं जाणार?माहिती समोर…

मुंबई : मुंबईतील सर्वात महत्त्वाकांशी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टलरोड प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिलायन्सकडे कोस्टल रोड लगतची 173 एकर जमीन तीस वर्षाच्या कराराअंतर्गत देण्यात आली आहे. हा करार कंपनीच्या सीएसआर धोरणांतर्गत करण्यात आला आहे.

रिलायन्स समूह आणि सरकारमध्ये झालेल्या या करारानुसार कोस्टलरोडवर काय काय साकारणार? याची माहिती आता समोर आली आहे.
> अमरसन्स गार्डन इंटरचेंजजवळ खुला रंगमंच म्हणजेच अॅम्फीथिएटर उभारलं जाणार आहे.

> वरळी येथील निष्क्रिय जेट्टीचे कायमस्वरूपी हेलिपॅडमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव या प्रकल्पाच्या माध्यमातून समोर ठेवण्यात आला असून त्यावरही काम केलं जाणार आहे.
> पाम वृक्षांनी सजलेली निसर्गवाट या ठिकाणी उभारली जाणार आहे.
> काही ठिकाणी ‘मियावाकी’ पद्धतीने मायक्रो-फॉरेस्ट विकसित केले जाणार असून हे येथील मुख्य आकर्षण ठरतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
> हाजी अली परिसरात पिकल बॉल कोर्ट उभारण्याची योजना या महत्त्वकांशी प्रोजेक्टअंतर्गत आखण्यात आली आहे.
> वरळी ते महालक्ष्मी दरम्यान ‘कॉन्फ्लुएन्स गार्डन्स’ आणि वुडलँड्स तयार करण्यात येणार आहे.
या बहुचर्चित महत्त्वकांशी प्रकल्पासाठी रिलायन्स कंपनी आपल्या सीएसआर निधीमधून 400 कोटी रुपये खर्च करुन 30 वर्ष या भागात लँडस्केपिंग करणार असून सर्व देखभालीचा खर्चही उचलणार आहे. म्हणजेच 2026 ते 2056 पर्यंत ही जमीन रिलायन्सच्या ताब्यात राहणार असून तिचं सर्व व्यवस्थापन कंपनीकडून पाहिलं जाणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच हा प्रकल्प लोकांसाठी 2029 मध्ये खुला होणार आहे.