शासकीय यंत्रणेची फसवणूक करण्याचा प्रयत्न; सीएससी केंद्रचालकासह दोघांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : रिक्षा चालवण्यासाठी परमिट बॅच मिळावा यासाठी बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरात घडली असून बार कोडमुळे सदर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहायक फौजदार रामदास शंकर मेमाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मैनुद्दीन हुसेन सय्यद (वय ५४, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) व सचिन हरिभाऊ मगर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास मेमाणे हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेल्या आठ महिन्यांपासून पोलीस चारित्र्य पडताळणी विभागात कार्यरत आहेत. ते ऑनलाईन पोर्टलवरून येणाऱ्या अर्जांची रितसर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करतात.
दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी पुणे शहर विशेष शाखेकडून आलेल्या पत्रानुसार एका संशयास्पद पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. संबंधित प्रमाणपत्रावर नमूद असलेला बारकोड क्रमांक संशयास्पद आढळला त्याची तपासणी केली असता मूळ प्रमाणपत्रातील बारकोड विशिष्ट स्वरूपाचा असतो, परंतु सादर केलेल्या प्रमाणपत्रातील बारकोड वेगळ्या पद्धतीचा असल्याने ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, मैनुद्दीन सय्यद यांनी यापूर्वी पोलीस चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. परंतु त्यांनी राहत्या पत्त्याचा वैध पुरावा सादर न केल्याने त्यांचा अर्ज पोलीस ठाण्याकडून नामंजूर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. तरीही सय्यद यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करून ते रिक्षा परमिट व बॅच मिळवण्यासाठी वाहतूक शाखेकडे सादर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुढील चौकशीत हे प्रमाणपत्र घोरपडे वस्ती येथील ‘समृद्धी एंटरप्रायजेस (सीएससी)’ या केंद्रातून तयार करून दिल्याचे समोर आले.
या केंद्राचा मालक सचिन हरिभाऊ मगर याने बेकायदेशीररित्या बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याचेही उघड झाले.या प्रकारामुळे सरकारी यंत्रणेची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले असून दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी सचिन मगर याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक फौजदार रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रामहरी वणवे, सागर जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे