म्हाडाचं घर मिळवण्यासाठी पहिल्यांदा अर्ज करताय का? ‘ही’ चूक पडणार महागात; पाहा काय आहे नवा नियम?


मुंबई : स्वतःचे हक्काचे घर असावे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाची लॉटरी ही सर्वसामान्यांची पहिली पसंती ठरते. मुंबई म्हाडा लॉटरी जाहीर झाली असून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज प्रक्रियेवेळी एकाच व्यक्तीने तब्बल ७० पेक्षा अधिक वेळा अर्ज केल्याची उदाहरणे आहेत.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत ११८ घरांची विक्री सुरू करण्यात आली असली, तरी नव्या अटींमुळे अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनामत रक्कम भरल्यानंतर ठराविक वेळेत पुढील रक्कम न भरल्यास डिपॉझिटही जप्त होणार असल्याने खबरदारी आवश्यक ठरते.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने मुंबई शहरात ११८ घरांची थेट विक्री जाहीर केली आहे. यापूर्वी दोन किंवा अधिक वेळा सोडतीत न विकली गेलेली ही घरे आता लॉटरीशिवाय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या पद्धतीनुसार पात्र अर्जदारांना संधी दिली जाणार आहे. १७ फेब्रुवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेवटचे घर विकले जाईपर्यंत ती सुरू राहणार आहे.

दरम्यान,४ मार्चपासून अर्ज सादर करण्यासोबतच अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. विशेष म्हणजे अर्जदाराकडे आधीपासून स्वतःचे घर असले तरी या योजनेत घर खरेदी करता येणार आहे. त्यामुळे विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद अपेक्षित आहे.

या योजनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अनामत रक्कम भरल्यानंतरची अट. अर्जदाराने डिपॉझिट भरल्यानंतर ४८ तासांच्या आत संबंधित घराच्या एकूण किमतीपैकी १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जर ही रक्कम वेळेत जमा केली नाही, तर त्या घरावरील दावा रद्द केला जाईल. इतकेच नव्हे तर आधी भरलेली १ ते ६ लाख रुपयांची अनामत रक्कम परत मिळणार नाही. घरांच्या किमतींबाबतही चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या योजनेतील घरे ३१ लाख रुपयांपासून ते तब्बल ८ कोटी रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या घरांची संख्या मर्यादित असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काही घरांचे दर बाजारभावापेक्षा जास्त असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या नव्या नियमांसह ही घरे वेगाने विकली जातील की पुन्हा प्रतिसाद कमी राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!