महापालिकेला १५ दिवसांचा अल्टिमेटम! पुणेकरांनो पाणी जपून वापरा, पाणी टंचाई वाढली..

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणीकोट्याबाबत गंभीर स्थिती निर्माण झाली असून पुढील काही दिवसांतच पाणीटंचाईचा प्रश्न उभा राहू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेला केवळ १५ दिवसांचा अवधी उरला असून जलसंपदा विभागाने थकबाकी तातडीने न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. शहरासाठी११. ६० टीएमसी इतका पाणीकोटा मंजूर करण्यात आला आहे; मात्र हा साठा मर्यादित काळापुरताच शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जलसंपदा विभागाकडे महापालिकेची तब्बल ९३३ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. ही रक्कम त्वरीत न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. मागील महिन्यात ९५३ कोटी रुपयांची नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, महापालिका दरमहा फक्त १० कोटी रुपये पाणीपट्टी म्हणून जमा करत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षात मंजूर मर्यादेपेक्षा ८.८४ टीएमसी अधिक पाणी वापरल्याची नोंद आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या नियमांनुसार मंजूर कोट्याच्या २५ टक्क्यांपर्यंत जादा वापर झाल्यास दीडपट दर आकारला जातो; तर त्याहून अधिक वापर झाल्यास तिप्पट दराने दंड आकारला जातो. त्यामुळे थकबाकी वाढत गेली असून ती निकाली न निघाल्यास पुणेकरांसमोर पाणीबंदीची वेळ येऊ शकते.
२०१६ पासून अतिरिक्त पाणीवापर होत असल्याचे विभागाकडून नमूद करण्यात आले आहे. एकूण ९५२ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी होती. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये १९ कोटी ७५ लाख रुपये भरल्यानंतरही फेब्रुवारीअखेर ९३२ कोटी ८८ लाख रुपये बाकी असल्याचे सांगण्यात आले. ३१ जानेवारीअखेर ११.२३ टीएमसी पाणी वापरले गेले असून उर्वरित ०.३६ टीएमसी साठा पुढील १२ दिवसांत संपण्याची शक्यता आहे.