निवडणुका संपल्या! नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? शेतकरी प्रतीक्षेत..

पुणे : राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यात थेट बँक खात्यात जमा केले जातात. योजनेचा आठवा हप्ता अद्याप जमा झाला नसल्याने शेतकरी सातत्याने चौकशीसाठी बँकां आणि कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत.आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळण्याची शक्यता होती. मात्र, अजूनही पैसे खात्यात जमा झालेले नाहीत.या योजनेचा 8वा हप्ता याआधीच जमा व्हायला हवा होता. मात्र या हप्त्यासाठी आता शेतकऱ्यांना आणखीन वाट पहावी लागणार आहे.
पीएम किसानचा 21वा हप्ता जमा होऊन 2 महिने उलटले तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता झालेला नाही. योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी तांत्रिक कारणांमुळे विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.या योजनेमुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. मात्र या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

दरम्यान आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होळीच्या कालावधीत पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.