मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा?’ प्रशासक राज ‘ला तूर्तास स्थगिती, हायकोर्टाचा आदेश

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडलेल्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.अशातच आता राज्यातील 14237 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत संपणार आहे.ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र याला हायकोर्टाकडून स्थगिती मिळाली असून आता ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारने कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने 23 जानेवारी 2026 रोजी परिपत्रक काढत ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.मात्र हा निर्णय ग्रामीण भागातील लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा करत निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
आता या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली असून पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामुळे राज्यातील 14237 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत एकक असून निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फतच तिचा कारभार चालवला गेला पाहिजे. कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
हायकोर्टाकडून या निर्णयाबाबत राज्य शासनाला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले असून याचिकेवर पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.