उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या समोरील स्पीड ब्रेकर ठरतोय घातक ;कंटेनर अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू तर तिघेजण जखमी

उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोर मालवाहतूक पिकअपला मागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप मधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीसह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी (ता. 11) पहाटे पावणे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

या अपघातात किसन बजरंग खंडाळे (वय-46, रा. घोटी, ता. करमाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी लता किसन खंडाळे (वय-42), मुलगा सुरज किसन खंडाळे (वय -24) आणि पिकअप चालक लक्ष्मण ननवरे (वय – 26, सर्व रा. घोटी, ता. करमाळा) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चौघेही करमाळा तालुक्यातील घोटी येथील शेतकरी असून कुटुंब फुले विक्रीसाठी पुण्यातील गुलटेकडी मार्केट येथे गेले होते. विक्री करून माघारी परतताना पिकअपमध्ये चालकासह चार जण प्रवास करत होते. त्यापैकी दोन जण वाहनाच्या मागील बाजूस बसले होते.

उरुळी कांचन येथील चौकाजवळ येताच चालकाला रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने अचानक ब्रेक मारावा लागला. त्याच वेळी मागून येणाऱ्या अज्ञात कंटेनरने पिकअपला जबर धडक दिली. धडकेमुळे मागे बसलेले किसन खंडाळे रस्त्यावर फेकले गेले आणि कंटेनरच्या चाकाखाली आले. या अपघातात किसन बजरंग खंडाळे यांचा चेंदामेंदा झाला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील कर्मचारी, कस्तुरी ॲम्बुलन्सचे चालक संतोष झोंबाडे, माऊली लाड, रतन चव्हाण तसेच कदम ॲम्बुलन्सचे वैभव कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन चौकात वारंवार अपघात होत असून नागरिकांना चौक ओलांडताना जीव मुठीत धरावा लागत आहे. या चौकातील धोकादायक परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
महामार्गाचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराचे दुर्लक्ष..
सदर पुणे -सोलापुर महार्मार्गाचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले असून यापूर्वीही ग्रामपंचायत प्रशासन व उरुळी कांचन पोलिसांनी त्याच्याकडे पाठपुरावा करून या चौकात योग्य दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना आणि स्पीड ब्रेकरवरील पांढरे पट्टे मारण्याची मागणी केली होती. अशी माहिती ग्रामपंचायत व उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दिली. गतिरोधक स्पष्ट दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. महामार्गाचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा गतिरोधक ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गतिरोधक असलेल्या ठिकाणी पांढरे पट्टे मारून माहिती फलक लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.