दिग्दज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला;पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या ८२७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

पुणे : राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीसाठी आज मतदान पार पडले. सर्वांच लक्ष लागून राहिलेला पुणे जिल्हा आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ८२७ उमेदवारांचे भवितव्य शनिवारी (७ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाच वाजता मतदान यंत्रात बंद झाले आहे. यामुळे आता काय होणार? या भीतीपोटी दिग्दज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर यंदा पुणे जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.या निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) रोजी सकाळी दहा वाजता सुरू केली जाणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वयक आणि रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या मिळून एकूण १४६ अशा एकूण २१९ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. या २१९ जागांसाठी मिळून एकूण ८२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठीच्या २९९ आणि पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठीच्या ५२८ उमेदवारांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आज पार पडल्या नंतर मतमोजणी येत्या सोमवारी (दि.९ फेब्रुवारी) असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सर्व उमेदवारांसाठी शनिवार (दि. ७ फेब्रुवारी) आणि रविवारची (दि.८ फेब्रुवारी) रात्र वैऱ्याची ठरणार आहे.
झेडपी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची तालुकानिहाय संख्या
(टीप :- अनुक्रमांक, तालुक्याचे नाव, गटांची संख्या आणि एकूण उमेदवार या क्रमाने)
१) जुन्नर — ०८ — २४
२) आंबेगाव — ०५ — १७
३) शिरूर — ०७ — २०
४) खेड — ०८ — २८
५) मावळ — ०५ — १३
६) मुळशी — ०३ — १८
७) हवेली — ०६ — २५
८) दौंड — ०७ — ३४
९) पुरंदर — ०४ — १९
१०) वेल्हे — ०२ — ०८
११) भोर — ०४ — २०
१२) बारामती — ०६ — ३२
१३) इंदापूर — ०८ — ४१.
पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची तालुकानिहाय संख्या
(टीप :- अनुक्रमांक, तालुक्याचे नाव, गणांची संख्या आणि एकूण उमेदवार या क्रमाने)
१) जुन्नर — १६ — ४८
२) आंबेगाव — १० — ३९
३) शिरूर — १४ — ४६
४) खेड — १६ — ६०
५) मावळ — १० — २७
६) मुळशी — ०६ — ३३
७) हवेली — १२ — ४२
८) दौंड — १४ — ३५
९) पुरंदर — ०८ — ३३
१०) वेल्हे — ०४ — २०
११) भोर — ०८ — २९
१२) बारामती — १२ — ४४
१३) इंदापूर — १६ — ७२.