ब्रेकिंग! महाराष्ट्रात 2 एप्रिलला राजकीय वारं फिरणार; शरद पवार निवृत्त होणार की तिसरी पिढी दिल्लीत जाणार?

पुणे : येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार आहेत. या सात जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या जागेचा देखील समावेश आहे.त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ दोन एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे ते राजकारणातून निवृत्त होणार की त्यांची तिसरी पिढी दिल्लीत जाणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

राज्यसभेच्या सात जागांसाठी मार्च 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे 4 तर भाजपचे 3 खासदार बिनविरोध निवडून गेले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, फौजिया खान, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव, तर भाजपकडून भागवत कराड, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचा समावेश होता. मात्र आता यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागावर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवारांनी आपल्या सोशल मिडिया बायोमध्ये एक्स मेंबर ऑफ पार्लामेंट असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी राज्यसभेची खासदारकी सोडल्याचं स्पष्ट होत आहे.

त्याचबरोबर शरद पवार यांनीही यापूर्वी राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.