लँडिंगचा शेवटचा निर्णय कुणाचा? अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासातून धक्कादायक माहिती

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि DGCA च्या पथकांनी आता तपासाचा वेग वाढवला आहे. विमान लँडिंग करण्याचा निर्णय कोणाचा होता? तसेच दुसऱ्या प्रयत्नात विमान लँडिंग कस झालं?तपासातील हे नवे धागेदोरे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

तपासात असे समोर आले आहे की,पहिल्या प्रयत्नात दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाने ‘गो-अराउंड’ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी दिसत नसतानाही लँडिंग करण्याचा धोका का पत्करण्यात आला, विमान लँडिंग करण्याचा शेवटचा निर्णय कुणी घेतला? वैमानिकाने घेतला की त्यांना तशी कमांड देण्यात आली? या अनुषंगाने तपास केला जात आहे. यातून काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या विमान अपघाताच कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा चार पैलूवर भर देत आहेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे दृश्यमानता. अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते. दृश्यमानता केवळ ८०० ते ३००० मीटर असतानाही वैमानिकाने लँडिंगचा निर्णय का घेतला?दुसरी बाब म्हणजे वैमानिकाला लँडिंगसाठी ‘क्लिअर कमांड’ दिली गेली होती का, की सिस्टिममध्ये काही तांत्रिक गोंधळ झाला होता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,

तिसरी गोष्ट म्हणजे अप्रोच आणि लँडिंग दरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये किंवा नियंत्रण प्रणालीत अचानक काही बिघाड झाला होता का? चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडींग अँगल चुकला आणि ते धावपट्टीऐवजी बाजुला जाऊन कोसळलं का? हा निर्णय कुणाचा? या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान दुसरीकडे विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सध्या दिल्लीतील प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून, त्यातील डेटा लवकरच समोर येणार आहे.