बारामतीत सलग दुसऱ्यांदा पवार कुटुंबाची बैठक, कोणत्या गोष्टीवर चर्चा? रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं…

बारामती : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबांमधील एकी दिसून येत आहे. बुधवारी पार पडलेल्या कुटुंबाच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबीयांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवारांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार असे पवार कुटुंबीयातील सदस्य होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबीयांची जवळपास पावणे दोन तास ही बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी स्वत: अजित दादांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. या बैठकीनंतर आता रोहित पवारांनी नेमकी चर्चा काय झाली? याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे.कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
ते म्हणाले, दादांच्या निधनापासून २८ जानेवारी पासून परिवारात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या दु:खद काळात आम्ही एखादी राजकीय भूमिका घेणं, हे आमच्यासाठी भावनिक दृष्टीकोनातून अवघड जातं आहे.. ९ तारखेनंतर स्पष्टपणे आपल्याला या सगळ्या गोष्टींवर बोलता येईल असं रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितलं.

दरम्यान विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचं स्मारक उभं राहावं, याबाबत चर्चा झाली. त्यांचं इथं म्यूझियम बनवावं, अशी देखील लोकांची मागणी आहे,असं ते म्हणाले. तसेच शेवटी दादांची इच्छा काय होती? काय गोष्टी घडल्या? हे कुठंतरी लोकांपर्यंत गेल पाहिजे. मात्र याची चर्चा कुणीच दुर्दैवाने करत नाही. याला मोठ मोठ्या नेत्यांनी राजकीय स्वरुप दिलंय, हे परिवारातील एक व्यक्ती म्हणून दु:ख वाटतं असं रोहित पवार म्हणाले.