अजित पवारांच्या अपघातानंतर विमान कंपनीवर गंभीर आरोप, VSR Aviation सराईत गुन्हेगार, दुसरे प्लेन क्रॅश झाल्याचा दावा…,कोणी केला आरोप?

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

मुंबईहून अवघ्या 20 ते 25 मिनिटांत बारामती गाठणाऱ्या या अत्याधुनिक विमानाचा अपघात कसा झाला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे निघाले होते.
लँडिंगच्या काही क्षण आधी तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेने केवळ राजकीय नव्हे तर विमान वाहतूक क्षेत्रातही मोठी खळबळ उडवली आहे.

विमान लँडिंगला अवघे काही मिनिट शिल्लक असताना हा अपघात झाल्यामुळं या अपघाताविषयी एक संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक खळबजनक दावा करणारी पोस्ट X वर केली आहे. त्यांनी या अपघाताबाबत विमान कंपनी VSR कडे बोट दाखवलं आहे.
सुहेल सेठ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान VSR Aviation च्या मालकीचं होतं. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे हे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. पिता-पुत्र ही कंपनी चालवतात. ते लोकांना DGCAIndia हे आमच्या खिशात आहे असं लोकांना सांगत फिरत असतात. ही चार्टर कंपनी बंद केली पाहिजे.
VSR Aviation कंपनीच्या विमानाचा हा गेल्या तीन वर्षातील दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर विशाखापट्टणम येथून आलेल्या विमानाचं लँडिग दरम्यान अपघात झाला होता. पावसामुळे विमान धावपट्टीवरुन घसरल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. या विमानात सहा जण होते. यातील सहवैमानिक गंभीर जखमी झाला होता.
अपघातग्रस्त विमान Learjet 45 असून विमानाची मालकी VSR Ventures Pvt Ltd कंपनीची आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार कंपनीचे मुख्यालय दिल्ली असून मुंबई, भोपाळ, हैदराबाद येथेही कंपनीची कार्यालये आहेत. विजय कुमार सिंह हे कंपनीचे मालक आहे.
दरम्यान, VSR Ventures Pvt Ltd ही कंपनी 15 वर्षांपासून हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत असून कंपनीत किमान 60 वैमानिक आहेत. VSR व्हेन्चर्सतर्फे खासगी कंपन्यांमधील बडे अधिकारी, उद्योजक यांना विमान सेवा पुरवली जाते. कंपनीची वेबसाईट दुपारी 12 वाजल्यापासून बंद आहे.
