बारामतीवर आभाळ फाटलं! “आमचे दादा आम्हाला परत द्या” कार्यकर्त्यांची आर्त हाक, ‘दादा,दादा ‘म्हणत रडारड…


बारामती : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण बारामती शहर सुन्न झाल आहे. त्यांच्या या विमान अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच लाडक्या नेतृत्वाच्या चिंतेने बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला असून, शहरात अत्यंत हृदयद्रावक शोककळा पसरली आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’च्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, आपल्या नेत्यासाठी अनेक जणांना अश्रू अनावर झाले आहेत.वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा ताफा जमा झाला असून, “आमचे दादा आम्हाला परत द्या” अशा आर्त हाका मारत कार्यकर्ते रडत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हादरला असून बारामती रुग्णालया बाहेर कार्यकर्त्यांनी अफाट गर्दी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून बारामतीमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद केली आहेत. आजूबाजूच्या गावातून हजारो नागरिक आणि कार्यकर्ते बारामती शहराच्या दिशेने येत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने अद्याप त्यांची अधिकृत ओळख पटू शकलेली नाही.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी, लोकांच्या मनातील भावना अनावर झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर प्रचंड गर्दी असल्याने प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!