राजकारणात भूकंप! शिंदेंच्या शिवसेनेत फुट पडणार? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाची आरक्षण सोडत होऊनही अद्याप महापौर निवडीचा मुहूर्त लागलेला नाही.अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सुरू केली आहे. आज शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार आहेत. या संदर्भात दावोस दौऱ्यात चर्चा झाल्याचही ते म्हणाले.
याआधी ठाकरे सेनेचे अंबादास दानवे शिंदे यांच्या शिवसेनेत येणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, उद्योग मंत्री उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपात चालले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? दावोसमध्ये काय चर्चा झाली तुम्हाला माहिती आहे का? असे राऊत म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, अंबादास दानवे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, हे तुम्ही कसे म्हणू शकता. अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहेत, त्यांनी 3-4 पक्ष बदलले नाहीत. जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
