स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, विक्रोळीत धक्कादायक घटना, घटनेला नेमकं कारणीभूत कोण?

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त लावण्यात आलेला स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार मुंबईतील विक्रोळी भागात टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विक्रोळी टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स्पीकर लावण्यात आलेला होता. तीन वर्षांची चिमुरडी धावत जात असताना स्पीकर तिच्या अंगावर कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. चिंध्या गोळा करणाऱ्याच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्याच्या डोक्यावर असलेल्या चिंध्यांचा भार वायरमध्ये अडकून हा स्पीकर तीन वर्षांच्या मुलीच्या अंगावर तो पडला.

या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती, परंतु उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
