शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, जाणून घ्या…

पुणे : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रातून 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्यास मंजुरी दिली असून, या खरेदीचे एकूण मूल्य सुमारे 2696 कोटी रुपये इतके आहे.

ही खरेदी किमान आधारभूत किमतीनुसार होणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तुरीच्या दरात चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती.
अनेक ठिकाणी बाजारभाव MSP पेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे थेट सरकारी खरेदीचा मार्ग खुला झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही खरेदी केंद्र सरकारच्या मूल्य समर्थन योजना अंतर्गत करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील मध्यस्थ, दलाल किंवा व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. थेट सरकारी संस्थांकडून खरेदी होणार असल्याने व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि शेतकऱ्यांना योग्य दर वेळेत मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या खरेदी प्रक्रियेसाठी नेफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय संस्थांना राज्य सरकारच्या समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या तुरीची विक्री सहज करता यावी यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या निर्णयावर बोलताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर तूर खरेदीमुळे केंद्र सरकारवर आर्थिक भार पडणार असला, तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. “शेतकऱ्यांच्या घामाला दाम देणे ही आमची जबाबदारी आहे आणि खरेदी प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही याची आम्ही खात्री देतो,” असे त्यांनी म्हटले आहे.
