पुण्यात अपघाताचा थरार; चार वर्षांचा आर्यन रोड रोलरखाली आला अन्………

पुणे : पुण्यातील दौंड शहरात रस्त्याच्या डांबरीकरणावेळी रोड रोलर खाली चिरडून एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,या दुर्घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आर्यन जाधव असे आहे.तो मजूर म्हणून काम करणाऱ्या एका कामगार महिलेचा मुलगा असल्याचं उघड झालं आहे. शहरातील जनता कॉलनी भागातील सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरु होते. या रस्त्याच्या कामासाठी काही कामगार काम करत होते. या कामगारांमध्ये एक महिला आपल्या ४ वर्षीय मुलाला घेऊन काम करत होती. यादरम्यान लवकर काम उरकण्याच्या नादात रोड रोलर चालकाने रोलर फिरवण्याचा वेग वाढवला.
या रोलर खाली सापडून आर्यन जाधव याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर रोड रोलर चालक घटनास्थळावरुन पळून गेला. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण करत असताना सुरक्षात्मक उपाय केले नसल्याचे समोर आले आहे.

