मंत्री गोगावलेंच्या मुलाला अटक का नाही? कोणाचं अभय; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले खडेबोल

पुणे : महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेल्या अपयशावर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्यासह इतर आरोपी आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर तसेच गृहमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोपींना अटक न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भरत गोगावले यांचा मुलगा विकास, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप, श्रीयांश जगताप यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात न आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे कि,माननीय मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाही, असा बोचरा सवाल न्यायालयाने विचारला.महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाल्याचे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. राज्य सरकारने लवकर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. नवे नगर परिसरात मतदान सुरू असताना अचानक शिवसेना आणि राष्ट्रावादीतील कार्यकर्त्यांच्या गटात हाणामारी झाली होती.
या राड्याप्रकरणी गोगावले यांच्या मुलावर, पुतण्यावर गुन्हा दाखल झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, मात्र विकास गोगावले अजूनही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.