‘नॉट रिचेबल’ झालेल्या ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्कें तब्बल 24 तासानंतर समोर, गायब होण्यास कोणी सांगितलं?

पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असताना नगरसेवकांची पळवा पळवी सुरू आहे. ठाकरे गटाच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल होता.मात्र, २४ तासानंतर डॉ. सरिता यांनी नॉट रिचेबल असल्याचे कारण सांगितले आहे.

डॉ. सरिता म्हस्के यांनी मध्यरात्री ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर म्हस्के यांनी कोकण आयुक्तांकडे आपली नोंदणी केली. त्यानंतर नॉट रिचेबल आपल्या पक्षाच्या सांगण्यावरून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


सरिता मस्के म्हणाल्या, देवदर्शनाला मीं पतीसह गेले होते. बुधवारच्या बैठकीबाबत मंगळवारी रात्री उशिरा निरोप मिळाला. तोपर्यंत आम्ही निघालो होतो. आम्ही मिलिंद नार्वेकर यांना माघारी येत असल्याचे कळवले. मात्र, माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावेळी आम्हाला पक्षाने तात्काळ फोन बंद करण्याचे आदेश दिले होते. आम्हाला ट्रेस केले जाईल, त्यासाठी फोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
पुढे बोलताना सरिता मस्के म्हणाल्या, मुंबईत पक्ष नेत्यांना भेटण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले.पक्षाकडून आमची काळजी घेण्यात आली. आमच्या सुरक्षितेसाठी आणि काळजीसाठीच नॉट रिचेबल राहण्याचे आदेश पक्षाने दिल्याचे सांगण्यात आले.
बुधवारी नवी मुंबईतील कोकण भवन येथे ठाकरे गटाच्या ६५ नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पार पडली. मुंबईच्या प्रभाग क्रमांक १५७ मधून ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के गैरहजर होत्या. त्याआधी डॉ. सरिता म्हस्के या शिवसेना भवनातील बैठकीतही अनुपस्थित होत्या. म्हस्के यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली होती.
