राजकारणात खळबळ!मनसेची शिंदेसेनेसोबत युती, संजय राऊत भडकले, राज ठाकरेंना म्हणाले….

मुंबई : कल्याण डोंबिवलीत मनसेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे. यावरून राजकारणात खळबळ उडाली आहे. मनसेच्या याच निर्णयावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत भडकले आहेत.

संजय राऊत म्हणाले, ज्यांनी शिवसेनेशी, ठाकरे कुटुंबाची बेईमानी केली त्यांच्याशी कोणतेही राजकीय वा अन्य संबंध ठेवायचे नाहीत, हे आमचे स्पष्ट आहे. महाराष्ट्रातल्या गद्दारांना मदत करणार नाही किंबहुना मदत होईल अशी भूमिकाही घेणार नाही. शिंदेंची शिवसेना ही आमच्यासाठी एमआयएम आहे. बेईमान आणि महाराष्ट्रद्रोही आहे असा हल्लाबोल त्यांनी चढवला.
पुढे बोलताना ते म्हणाले, सत्ता येते-जाते, आम्ही सत्तेला हापापलेलो नाही. राज ठाकरेही सत्तेसाठी हापापलेले नाहीत. स्थानिक निर्णय म्हणून या विषयाकडे राज ठाकरे यांनी पाहू नये, स्थानिक पातळीवर युती आघाडी झाली असेल तर पक्षनेतृत्वाने हस्तक्षेप करावा, त्यांच्यावर कारवाई करावी. कल्याण डोंबिवलीतील सेना-मनसेच्या युतीला राज ठाकरे यांचा पाठिंबा नाही, असे राऊत म्हणाले.

महापालिका निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली.मात्र निवडणुकीचा निकाल लागताच दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्या. कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे. मनसेच्या याच निर्णयाविरोधात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
