मुंढवा जमीन घोटाळा; पार्थ पवारांच्या मामेभावाला कोणत्याही क्षणी अटक,न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला….

पुणे : पुण्यातील मुंढवा येथील 40 हेक्टर जागेच्या खरेदी- विक्री घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार असलेला मामेभाऊ दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा अंतर्गत सरकारी मालकीच्या जमिनीची बेकायदेशीर विक्रीप्रकरणी दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या व्यवहारात सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करत न्यायालयाने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्यात आला आहे.
कोण आहेत दिग्विजय पाटील?

दिग्विजय पाटील हे माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांचे सावत्र बंधू अमरसिंह पाटील यांचा मुलगा आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे.
तेर गावामध्ये दिग्विजय पाटील यांची जवळपास 100 एकर जमीन आहे आणि घर सुद्धा आहे. गेली 25 वर्षापासून अमरसिंह पाटील यांचे कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक आहे. दिग्विजय पाटील यांचे वडील अमरसिंह पाटील तेरचे सरपंच राहिलेले आहे. त्यांनी जिल्हा परिषद सुद्धा लढवली आहे.
कोरेगाव पार्क मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमिनीची 300 कोटी रुपयांची विक्री दाखवून 6 कोटींच्या मुद्रांक शुल्काची चोरी केल्याचा आरोप दिग्विजय पाटील यांच्यावर आहे. याप्रकरणी पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्यामुळे अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
