पुण्यात भीषण अपघात; मिनी बसची दुचाकीला जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर

पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावरील मांजरी परिसरात एका मिनी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एका वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वाघोली रस्त्यावरील सिरम कंपनीसमोर दुचाकी आणि मिनीबसचा जोरदार अपघात झाला आहे.केडगावचा रहिवासी असलेला आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०) आणि त्याचा मित्र मनोहर अण्णा रणसिंग हे दोघे कामावर हडपसरकडून वाघोलीच्या दिशेने जात होते. वाटेत सिरम कंपनीसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते पुन्हा मुख्य रस्त्यावर आले. मात्र, तेव्हाच एका मिनी बसने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती कि, यात आदित्य शेळकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत मिनी बस चालक माऊली अंभोरे (वय २३, रा. आव्हाळवाडी) याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, बस चालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत आहे का, याची चौकशी केली जात आहे.