मोठी बातमी! दहावीच्या विद्यार्थ्यांना 2 दिवसात’ हॉल तिकीट’ ऑनलाईन उपलब्ध होणार ; असं करा डाउनलोड?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीट येत्या मंगळवारपासून (२० जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.mahahsscboard.in) ही प्रवेशपत्रे ‘लॉगिन’ करून डाउनलोड करता येणार आहेत. शाळांनी हे हॉल तिकीट प्रिंट करून, त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरी घेऊन ती विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. विशेष म्हणजे, हॉल तिकीटची प्रिंट काढून देण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना मंडळाने दिल्या आहेत.


हॉल तिकीटवरील विद्यार्थ्याचे नाव, फोटो, सही किंवा विषयामध्ये काही त्रुटी किंवा चुका असल्यास, शाळांना त्या ऑनलाइन पद्धतीने दुरुस्त करता येतील. मात्र, जर फोटो किंवा स्वाक्षरीमध्ये बदल करायचा असेल, तर शाळांनी त्या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे प्रत्यक्ष जाऊन करून घेणे आवश्यक आहे.
दरम्यान दहावीची मुख्य परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी आपली हॉल तिकिटे शाळेतून वेळेवर प्राप्त करून घ्यावीत आणि त्यावरील माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.
