उरुळी कांचन येथील टपरीचालकावर अज्ञाताकडून कोयत्यासह दांडक्याने मारहाण करत गोळीबार ; 6 ते 7 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका टपरीचालकावर काही अज्ञातखोरांनी कोयत्यासह दांडक्याने हल्ला करून गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टपरी चालक एका हॉटेलच्या बाहेर मोबाईल फोनवर बोलत उभा असताना हा हल्ला झाला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्णा बाबासाहेब हवलदार (वय 26, व्यवसाय – पानटपरी रा. उरूळी कांचन ता हवेली) असे मारहाण झालेल्या टपरीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा हवलदार यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात 6 ते 7 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (ता. 16) गुऱ्होळी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील वाघापुर-चौफुला रस्त्यावरील हॉटेल महाराजा येथे कृष्णा हवालदार आपला मित्र संदिप देवराम हे जेवणासाठी थांबले होते. बिल देण्यासाठी थांबले असता हवलदार यांना त्यांच्या आईचा फोन आल्याने ते बोलण्यासाठी बाहेर आले.यावेळी उरूळी कांचन बाजुकडुन 3 दुचाकी मोटर सायकलवरून आलेल्या 6 ते 7 अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.त्यातील एका मुलाने लाकडी दांडक्याने पाठीत व पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली. तर हातात कोयता असेलल्या एका मुलाने डोक्यात डाव्या बाजुस वार केला त्यामुळे डोक्यातुन रक्त स्त्राव होऊ लागला.

तसेच त्यांच्यातील एकाने गावठी पिस्तुलाने एक गोळी हवेत फायर केली व दुसरी गोळी जिवे मारण्याचे उददेषाने कृष्णा हवलदार यांच्या दिषेन फायर केली. परंतु ती गोळी त्यांना लागली नाही. गोळीचा आवाज ऐकून हॉटेलमधील काहीजण बाहेर आल्यानंतर अज्ञात हल्लेखोर पळून गेले.दरम्यान, डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने संदिप देवराम याने त्याच्या मोटर सायकलवरून कृष्ण हवलदार यांना उरूळी कांचन येथील सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान या सर्व घटनेची माहिती उरूळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलिसांना सांगीतला. या घटनेची माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली आणि त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात 6 ते 7 जणांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.