शाई पुसून दुसऱ्या प्रभागात बोगस मतदान होणार नाही, याची हमी कोण देणार? राज्यात सगळा गोंधळच गोंधळ….

पुणे : राज्यात आज महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाचे याकडे लक्ष का जात नाही? धायरी परिसरात बोटावरील शाई पुसून बोगस मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत त्या म्हणाल्या, याबाबत जागरूक नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की एकदा मतदान केल्यानंतर शाई पुसली तरी पुन्हा मतदान करता येत नाही. परंतु शाई पुसून दुसऱ्या प्रभागात बोगस मतदान होणार नाही, याची हमी कोण देणार? असेही ते म्हणाले.


तसेच संपूर्ण मतदान प्रक्रिया संशयास्पद ठरत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
अनेक राजकीय पक्षांनी मतदानासाठी बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईवर आक्षेप घेतला आहे. मतदान केल्यानंतर काही वेळाने ही शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेले निवडणूक आयोग पुन्हा एकदा टीकेचे धनी बनले आहेत.
याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शाई निघत असल्याचा आरोप राज्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरतोय, तीच शाई आम्ही वापरतोय. ही शाई काढता येत नाही, असा दावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला. मात्र यावर कोणाचे समाधान झाले नाही.
एकदा मतदान करुन गेल्यानंतर पुन्हा मतदान करण्यासाठी एखादा आला, तर मतदान केंद्र अधिकारी त्यावर नक्कीच कारवाई करेल असं दिनेश वाघमारे म्हणाले. मात्र अनेक ठिकाणी बोगस दुबार मतदान असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून राजकीय वातावरण तापणार आहे.
